Sweet Relationship
*गोडवा नात्यातला!…*
काही नाती ही पाहताच क्षणी मनाला भावणारी असतात. आमचे एक आजोबा आहेत. एक दिवस त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, “आज जरा घरी येशील का आणि हो येताना मोतीचुर लाडू आण आणि तेही चितळेचे.” मी बरं म्हणाले. मी काही विचारलं नाही त्यांना. मी लाडू घेऊन गेले.
काका एकदम छान तयार होऊन बसले होते. मला वाटलं काही तरी स्पेशल असेल. मग म्हणाले, “चहा पिऊ आपण आणि मग करू प्रोग्रॅम स्टार्ट!”
मला काही कळेना. घरात तर आजोबा एकटे राहतात आणि कसला प्रोग्रॅम? काही संदर्भ लागत नव्हता.
मी आपलं न राहवून विचारलं, “अहो काका, आता तरी सांगा की नक्की काय आहे आज?”
मग म्हणाले, “हसणार नसशील तर सांगतो.”
मी म्हणाले, “अहो मी का हसेन?”
त्यावर ते म्हणाले, “आज मी माझ्या बायकोला भेटून 45 वर्ष झाली. आज तोच दिवस ज्या दिवशी मी तिला पहिल्यांदा भेटलो आणि आमचा लग्न ठरलं होतं.
मी हा दिवस कायम साजरा करतो. कारण लग्नाची anniversary किंवा अगदी साखरपुडाची aniversary आपण करतो पण त्या पेक्षा मी तिला भेटलो तो दिवस मला महत्वाचा वाटतो. म्हणून मी नेहमी साजरा करतो. आमच्या काळात तुमच्यासारख आधी भेटणं वगैर काही नव्हतं. पण म्हणूनच ती भेट कायमची लक्षात राहिली.”
त्यांनी आपल्या बायकोच इतकं सुंदर वर्णन केलं, गुलाबी कलरची साडी, लांब वेणी त्यात एक छान फुल, हातात मोत्याची बांगडी कानात कुडी आणि दोन्ही खांद्यावर पदर कपाळावर टिकली हे वर्णन करताना ते काकूंच्या फोटो समोर उभा राहून सांगत होते…
काकूंचा फोटो नसून पेंटिंग होते. त्याचीही गंमत त्यांनी सांगितली.
काकू आजारी पडायच्या आधी ते दोघे स्केच काढायला चित्रकाराकडे गेले होते. तेवढ्यात काकाना अचानक कुठे तरी जावं लागलं. त्या चित्रकाराला ते म्हणाले, ” तू हीच चित्र काढ तोपर्यन्त मी आलोच. ” पण ते कामामुळे येऊ शकले नाहीत. आणि त्यांचा दोघांचे एकत्रित चित्र राहूनच गेले.
नंतर पुढे कधी योग आला नाही आणि तोच फोटो मी गेल्यावर लाव असं म्हणल्या होत्या. कदाचित म्हणूनच आपल एकत्र चित्र झालं नाही असेही आजोबा म्हणाले.
त्या फोटो मध्ये त्या आजी इतक्या सुंदर दिसत होत्या. त्या नंतर काका त्या आठवणीत इतके रमले की 2 तास कसे गेले कळलं नाही. मला म्हणाले, “मानसी आयुष्यात चांगला जोडीदार मिळणे खूप महत्वाचे आहे आणि त्या पेक्षा तो टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. आम्ही जुन्या काळातले होतो पण तरी मी बायको ला अधून मधून I Love you नक्की म्हणायचो, Candle light dinner ला घेऊन जायचो.
माझी नोकरी फिरतीची होती ह्या गावातून त्या गावात नाही तर ह्या देशांतून त्या देशात होती तसे 34 देश फिरलो. त्यामुळे तिने पूर्ण वेळ मुलांना दिला. ती शिकलेली असून पण कधीही कोणतीच तक्रार न करता मुलांना उत्तम संस्कार देऊन वाढवलं , जेंव्हा तिला कॅन्सर डिटेक्ट झाला तेंव्हा तिने मला सांगितलं आता जेवढा काही काळ मी आहे तो वर सगळा वेळ आपण एकत्र घालवू, गप्पा मारू. आणि मग 2 वर्ष आम्ही एक दिवस सुद्धा एकमेकांना सोडून राहिलो नाही आणि ती दोन वर्षे मला मी असेपर्यंत पुरतील.
हल्ली असं मनापासून प्रेम पाहायला मिळत नाही, छोट्या छोट्या गोष्टी वरून गोष्टी घटस्फोटापर्यंत पोचतात, नवरा बायकोला आपली आपली स्पेस हवी असते. आमच्या वेळी हा शब्द पण नव्हता.”
त्या दिवशी काकांच्या तोंडून नवरा बायकोच्या नात्याविषयी निघणारा एक न एक शब्द मनाला भिडणारा होता.
आजोबा म्हणाले, “आता मी थांबतो. तू कंटाळीस तर माझ्याकडे यायची नाहीस.”
असं म्हणून त्यांनी मला मोतीचुर भरवला..
नात्यातला गोडवा लाडवात पुरेपूर उतरला होता!!…